राज ठाकरेंवर काहीही बोलू नका; ओवेसींचे कार्यकर्त्यांना फर्मान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता. त्यावरून विरोधकांनी राज ठाकरेंवर पलटवार केला असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र राज ठाकरे यांच्या विषयी कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

राज ठाकरेंवर काहीही बोलू नका असा फतवा असदुद्दीन ओवेसीनी काढला आहे. एमआयएम कार्यकर्त्यांना कोणत्याही गोष्टीवर बोलायचं नाही ठणकावून सांगण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या कुठल्याही वक्तव्यावरती टीका करायची नाही असं ओवेसी यांनी सांगितलं आहे अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. याबाबत वेळ आल्यावर बोलू मात्र आत्ता आम्ही राज ठाकरेंवर काहीही बोलणार नाही अस जलील यांनी सांगितले

तत्पूर्वी राज ठाकरे यांनी काल जोरदार भाषण करत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावरून निशाणा साधला. मशिदींतील लाऊडस्पीकरबाबत सरकार काही निर्णय घेणार नसेल, तर मशिदींसमोर दुहेरी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचा जप करू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.