सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगलीतील मुख्य बस स्थानक परिसरात असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर असणाऱ्या लोखंडी जिन्याची दुरावस्था झाली होती. हा जिना कोणत्याही स्थितीत कोसळण्यासारखी परिस्थिती होती. महापालिका प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत डागडुजी करणे टाळले. याची माहिती नगरसेवक योगेंद्र थोरात यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पुतळा परिसरात धाव घेत स्वखर्चाने या जिन्याची दुरुस्ती करून घेतली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने लाखो रुपये खर्चून पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते. पण अवघ्या दोन वर्षातच पुतळ्यासमोर उभारण्यात आलेल्या लोखंडी जिन्याला गंज लागला. त्यामुळे हा जिना जीर्ण झाला होता. आंबेडकर जयंती निमित्त हजारो नागरिक अभिवादन करण्यासाठी येथे येत असतात. या लोखंडी जिन्यावर उभे राहून पुतळ्याला हार अर्पण केले जातात. हा जिना कोणत्याही परिस्थितीत कोसळण्याची भीती होती. याची माहिती नगरसेवक योगेंद्र थोरात यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पुतळा परिसरात धाव घेतली. त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून जिन्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली मात्र त्यांनी आचारसंहितेचे कारण पुढे केलं. अखेर नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी तातडीने स्वखर्चाने या जिन्याची डागडुजी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वि जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही स्थानीक नगरसेवकांनी पुतळा परिसराकडे मात्र पाठ फिरवल्याचं चित्र आहे.
जयंतीच्या काळात पुतळा परिसराची डागडुजी अथवा स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करून घेण्याचं साधं काम नगरसेवक करताना दिसत नाहीत. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांच्या कामबाबत तीव्र नाराजी आहे. अखेर मिरजेचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांना सांगलीमध्ये येत पुतळा परिसराची डागडुजी करावी लागली. योगेंद्र थोरात यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.