हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा भव्य मेळावा दसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील दसरा मेळावा मुंबईत येथेच आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदान कोणत्या गटाला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या या दोन्ही गटांमध्ये शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी वाद निर्माण झाला आहे. मात्र आता या वादातून शिंदे गटाने माघार घेतली असल्याचे म्हटले जात आहे. याची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
शिंदे गटाची माघार
माध्यमांशी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी दोन गटात निर्माण झालेल्या वादाविषयी बोलताना केसरकर यांनी म्हटले आहे की, “शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार आहे. आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत भांडायचे नाही. त्यांना फक्त सहानुभूतीचे राजकारण करायचे आहे, दसरा मेळाव्यासाठी आम्ही महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला आहे” त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद मिटल्याचे म्हटले जात आहे. मात्र असे असले तरी दसऱ्याच्या मेळाव्यासाठी ठाकरे गटाला तरी शिवाजी पार्क मैदान मिळेल का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सध्या शिवाजी पार्क मैदान मेळाव्यासाठी मिळण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, यावर्षी देखील दसरा मेळाव्यासाठी आपल्याला मैदान मिळावे म्हणून शिंदे आणि ठाकरे गटाकडून मुंबई महापलीकडे अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आपल्यालाच मिळेल असा दावा दोन्ही गटांकडून केला जात होता. मात्र आता शिंदे गटाचा यावर्षी दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे, शिवाजी पार्कवर आपलाच दसरा मेळावा होणार असून कार्यकर्त्यांना कामाला लागावे अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. या कारणामुळेच ठाकरे गटाचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथेच पार पडेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.