मुंबई प्रतिनिधी । शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यान मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित झालं आणि देवेंद्र फडणवीस यांना आपल्या औटघटकेच्या मुख्यमंत्रीपदाचा अखेर राजीनामा द्यावा लागला. ज्या अजित पवार यांच्या पाठिंब्याने फडणवीस रातोरात मुख्यमंत्री बनले होते. त्या अजित पवार याना आपल्यामागे कोणी नाही याची जाणीव झाली आणि अखेर नामूशकीतून त्यांनी राजीनामा दिला. मात्र, त्यामुळं मी पुन्हा येईन असा आत्मविश्वास असणाऱ्या फडणवीस यांचा पुन्हा हिरमोड झाला. आधी विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानं त्यांच्या नैतृत्वावर पक्षात दबक्या आवाजात टीका होती. परंतु, फडणवीस यांच्या वागणुकीतून दुखावलेले अनेकजण आता फडणवीस यांच्या नाचक्कीनंतर खुलेआम आता त्यांच्यावर शरसंधान साधत आहेत.
याची सुरुवात दुसऱ्या-तिसऱ्या कोणाने केली नसून भाजपचे निष्ठावंत आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. निवडणुकीच्या काळात किंवा त्यानंतर खडसे माध्यमात संयमी प्रतिक्रिया देत होते. फडणवीस यांच्या नैतृत्त्वात लढविलेल्या निवडणुकीत खडसे यांना विधानसभेचे तिकीट नाकारल्याने ते दुखावले गेले होते. दरम्यान, कालच्या फडणवीस यांची राज्याच्या सत्ताकारणात पीछेहाट झाल्यानंतर खडसे यांनी आपली मनातील खदखद आज प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवली. खडसे म्हणाले कि,’ वर्षानुवर्षे जे पक्षासाठी काम करता होते त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं गेलं. पक्षात अनेक जण नवीन येतात-जातात त्यांच्या एकत्रित काम केल्याने पक्षाला बळ मिळत. मात्र, दुर्दैवाने या निवडणुकीत जे कार्यकर्ते पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करत होते त्यांना तिकीट दिलं गेलं नाही. आणि जे नवीन लोक होती त्यांना तिकीट दिलं गेलं त्याचा परिणामही अप्रत्यक्षपणे जनमानसावर झाला आणि निवडणुकीत पक्षाला त्याचा फटका बसला. ‘
फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत सत्तास्थापन करण्यावर टीका करत खडसे पुढे म्हणाले कि, ‘ भाजपा नेहमीच भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आली आहे त्यामुळं अजित पवार यांच्याबरोबर गेल्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते निदान त्याच्या समवेत जाऊ नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे म्हणणं होत मात्र त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं.’ खडसे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून फडणवीस यांच्यावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. आता येणाऱ्या दिवसात फडणवीस यांच्या पडतीच्या काळात भाजपातील तावडे, बावनकुळे सारखे नेते सुद्धा फडणवीस यांच्या विरुद्ध काही बोलले तर त्यात आश्चर्य वाटायला नको.