हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून काही धरणं ओव्हरफ्लो झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. “पुरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक जनावरे, शेती पुरामुळे वाहून गेली आहे. मात्र, असंवेदनशील शिंदे सरकार गेली 15 दिवस जेवणावळीतच व्यस्त आहेत,” असा आरोप खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “गेली 15 दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. फडणवीस आणि शिंदे यांच्या दोघांच्या भरवश्यावरच राज्य सुरु आहे. मात्र, दोघांनाही ग्रामीण भागातील जनतेशी काही घेणे देणे नसल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे जनतेला दिलासा कोण देणार?
औरंगाबाद, उस्मानाबाद नामकरणावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिक्कामोर्तब केला होता. मात्र, शिंदे सरकार औरंगाबाद आणि उस्मानाबादचे पुन्हा नामांतर करुन स्वत: क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप खडसेंनी केला आहे.