“महाविकास आघाडी सरकार पाडलं तरी पुन्हा… ”; राष्ट्रवादीच्या नेत्याचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान काल एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिले असून त्यांनी महत्वाचे विधान केले आहे. “चंद्रकांत पाटील हे सत्तेतून बाहेर पडल्याने अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. आघाडी सरकार पाडले तरी बहुमताच्या जोरावर पुन्हा सरकार येईल, असे विधान खडसेंनी केले आहे.

भुसावळ येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. यावेळी खडसे म्हणाले की, “पाटील हे उत्तम भविष्यकार आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र, सरकार पाडायचा विचार केला व दुर्दैवाने सरकार पाडलं तरी बहुमताच्या जोरावर परत हेच सरकार येणार आहे. “सरकार पडायला ठोस कारण असला पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात असून जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे तोपर्यंत हे सरकार पडू शकत नाही

चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वणवण फिरावे लागत आहेत. त्यामुळे त्याच्याकडून अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत, अशी टीकाही यावेळी एकनाथ खडसे यांनी केली आहे.