हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी रात्रभर जळगाव शहर पेालीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. जिल्हा दूध संघात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.
जिल्हा दूध संघात एक ते दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. मात्र, पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा चांगलाच संताप झाला. त्यानंतर खडसेंनी पोलीस स्थानकातच ठिय्या आंदोलन केलं. पोलीस जर तक्रारच नोंदवून घेत नसतील, तर काय करायचं? पोलीसच जर असं वागत असतील तर सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळणार?’, असा सवाल खडसेंनी उपस्थित केला. तब्बल एक ते दीड कोटी रुपयांची चोरी होते, तरीही त्याचा गुन्हा दाखल होत नाही, आजच्या या संपूर्ण प्रकरणावरून कायदा व सुव्यवस्थेवरचा विश्वास उडाला असल्याची खंतही एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.
त्यानंतर, तब्बल आठ तासांच्या आंदोलनाानंतर दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची फिर्याद घेण्यात आली. जिल्हा दूध संघांत मालाच्या तपासणीत दूध संघातून 14 टन 80 लाखांचे पांढरे लोणी बाहेरच्या जिल्ह्यात पाठवण्याचे भासवण्यात आलं आहे. मात्र प्रत्यक्षात माल बाहेर गेल्याबद्दलच्या नोंदी कुठे दिसत नाहीत. तर दूधाच्या पावडरच्या साठ्यात 30 ते 35 लाख रुपये किंमतीच्या 360 बॅगची तफावत आढळून आली आहे. असे एकूण 1 कोटी 15 लाख रुपयांच्या मालाची चोरी झाल्याचे तपासणीतून समोर आले असून संबंधित माल हा दूध संघातील अधिकाऱ्यांच्या मदतीने इतरांनी चोरी केल्याचे दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.