भाजपचा जखमी वाघ नव्याने लढण्यासाठी सज्ज ; एकनाथ खडसे आज भरणार आपला उमेदवारी अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । प्रफुल्ल पाटील

राज्याचे माजी महसूल मंत्री आणि मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आपलं आराध्य दैवत असलेल्या मुक्ताई मातेचं आज त्यांनी सहकुटुंब दर्शन घेतलं. भोसरी येथील भूखंड घोटाळ्याच्या चौकशीत पत्नीचं नाव आल्यानंतर त्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला होता. भाजपमधील बहुजन गटाचं प्रतिनिधित्व करत उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात आपला जम बसवलेल्या एकनाथ खडसे यांच्यासाठी मागील ३ वर्षं अतिशय खडतर गेली आहेत.

दांडगा जनसंपर्क असलेला नेता अशी ओळख असलेल्या एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या टिप्पणीमुळे राजकीय वनवास घडला असल्याचंही बोललं जातं. राज्यातील क्रमांक २ चं नेतेपद भूषविलेल्या एकनाथ खडसे यांची जागा आता चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांनी घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसेंचं महत्व कमी करण्यासाठी गिरीश महाजन यांना पुढे करण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरली आहे. असं असलं तरी उत्तर महाराष्ट्रामधील खडसेंचा प्रभाव अद्यापही कमी झालेला नाही. मागील काही काळ जखमी अवस्थेत असलेला भाजपचा हा जखमी वाघ येत्या निवडणुकीत यशस्वी होणार का? आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा भरारी घेणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.