हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारने विरोधीपक्षनेते अजित पवार व महाविकास आघाडी सरकारला दणका देणारा निर्णय घेतला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षामधील जिल्हा विकास प्रकल्पांअंतर्गत देण्यात येणारा निधी रोखण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. अजित पवार यांच्या अंतर्गत येणाऱ्या या विभागाने 36 जिल्ह्यांसाठी विकास प्रकल्पांअंतर्गत 13 हजार 340 कोटींचा निधी मंजूर केला होता.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागासाठी हा निधी मंजूर केला होता. पण, नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत हा निधी दिला जाणार नाही, असे म्हणत शिंदे सरकारने त्याला स्थगिती दिली आहे. विभागाचे उपसचिव एस. एच. धुरी यांनी स्वाक्षरी केलेल्या शासन आदेशानुसार नव्याने मान्यता देण्यात आलेल्या योजनांवरील निधी रोखण्यात आला आहे.
जोपर्यंत सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत संबंधित निधीही देता येणार नाही,” असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शिंदे – फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयावर ‘मविआ’तील अनेक मंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विकास निधी म्हणून मान्यता दिलेला हा निधी सरकारने रोखला असल्यामुळे आता जिल्ह्यांमधील विकासकामे खोळंबून राहणार हे नक्की.