हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील सर्वात मोठ्या समृद्धी महामार्गाचं उद्या लोकार्पण होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका मुलाखतीत महामार्गाशी संबंधित अनेक मुद्दे सांगितले यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “समृद्धी महामार्गाचे काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला मीही महामार्गाचे काम पूर्णत्वास नेले आणि आता मी मुख्यमंत्री असताना त्याचे उदघाटन होत आहे याचा मला आनंद होत आहे. मात्र, काहींना समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण न व्हावे, असे वाटत होते, पण आपण समृद्धी महामार्गासाठी जीव धोक्यात घातला, अशी टीका शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत आज समृद्धी महामार्ग उभारणीवेळी आलेल्या अडचणीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, या महामार्गाच्या निर्मितीसाठी सुरुवातीला जमिनी द्यायला शेतकऱ्यांचा विरोध होता. त्यांना जमिनी द्यायला तयार करावं लागत होतं. काही ठिकाणी मुद्दाम विरोध करायला भाग पाडलं जात होतं. तेव्हा मी स्वत: बुलढाण्याला गेलो होतो. त्यांचा समज मी दूर केला. त्यांना फायदा दाखवून दिला. त्यांच्या जमीनीचा योग्य मोबदला देण्याचे वचन दिले.
लोकांना विश्वास नव्हता की त्यांना योग्य दाम मिळेल की नाही याचा पण मी त्यांना खात्री दिली. कागदावर सही करून दिली. तेव्हा हे लोक आपली जमीन द्यायला तयार झाले. लोकांच्या घराचा गोठ्याचा, विहीरीचा सगळ्याचा मोबदला त्यांना दिला. त्यामुळे लोकांनी एकत्र येत या महामार्गासाठी आपली जमीन दिली, असे शिंदे यांनी म्हंटले.