अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही; राज्यपालांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde Bhagat Singh Koshyari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्वपक्षीयांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून “राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मराठी माणसांमुळं मुंबई, महाराष्ट्राला वैभव प्राप्त झालं आहे. राज्यपाल हे एक संविधानिक पद आहे. त्यामुळे अशाप्रकारे अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही,” असे शिंदेनी म्हंटल आहे.

एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 106 हुतात्म्यांनी या मुंबईसाठी बलिदान दिले आहे. मराठी माणसांमुळे मुंबईला वैभव मिळाले आहे. मराठी माणसांचे योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. याबाबत राज्यपालांनी काही खुलासा केला आहे. पण त्यांनी कुणाचा अवमान होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे.

मुंबईत इतर राज्यातील लोक येऊन रोजगार मिळवतात. मात्र, ते मुंबईच्या असलेल्या महत्वामुळे मिळत असते. त्याचा अवमान कुणालाही करता येणार नाही. मुंबईवर अनेक प्रसंग आले, अनेक संकटे पाहिली. पण संकटकाळातही मुंबई थांबली नाही. करोडो लोकांनी मुंबई रोजगार देत आली आहे, असे शिंदे यांनी म्हंटले.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही कोश्यारींनी म्हंटले.