नवी दिल्ली | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे . त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी निवडणूक आयोग पत्रकार परिषद होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्याच्या दौ-यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकानेही सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेऊन निवडणूक आयोग राज्यातील निवडणुकीची तयारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेत आहे. यात राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे विविध मागण्या केल्या आहेत.
भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नाशिकच्या दौ-यावर होते. त्यामुळे राज्यातील निवडणुकीची तारीख शुक्रवारी किंवा पुढील दोन-तीन दिवसांत जाहीर होईल,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . दरम्यान विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्यासाठी राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे.