औरंगाबाद – घरातील वाद विकोपाला गेल्याने पतीने, पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून स्वतः सुद्धा विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना टाकळीवाडी (ता.गंगापूर) येथे शनिवारी घडली. हा प्रकार रविवारी (ता.१७) सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चंपालाल तानासिंग बिघोत (वय ५५), गंगाबाई चंपालाल बिघोत (वय ४८ रा.टाकळीवाडी ता.गंगापूर) असे या घटनेतील मृत पती, पत्नीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, टाकळी वाडी येथील बिघोत दांपत्य शनिवारी रात्री कामे आटोपून शेतात असलेल्या घराच्या ओट्यावर झोपले होते तर त्यांचा एक मुलगा घरात झोपला होता. मात्र, मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास या पती, पत्नीमध्ये भांडण जुंपले. यानंतर हा वाद विकोपाला गेल्याने पती चंपालाल याने पत्नी गंगाबाईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. यानंतर आईचा आवाज आल्याने घरात झोपलेला मुलगा राहुल याला जाग आली. बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता वडिलांनी बाहेरून कडी, कोयंडा लावल्याने त्याला बाहेर येता आले नाही. मात्र, तो मागील दरवाजा उघडून घरासमोर आला असता त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. त्याने नातेवाइकांच्या मदतीने आईला औरंगाबादेतील रुग्णालयात दाखल केले. याच दरम्यान, चंपालाल बिघोत याने पत्नी ठार झाल्याने जवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दुसरीकडे रुग्णालयात नेताना गंगाबाई यांचीही प्राणज्योत मालवली.
याबाबत रविवारी सकाळी पोलिस पाटील उदलसींग जारवाल पोलिसांना कळविले असता दौलताबाद पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे अधिकारी संजय कुलकर्णी, दीपक गाडेकर, दिनेश मुंगसे, छगन सलामाबाद, महेंद्र खोतकर, विजय खोतकर, जगदीश सलामाबाद यांनी विहिरीतून मृतदेह वर काढून शवविच्छेदनासाठी पाठविला. यानंतर घटनास्थळी पोलिसांसह फाँरेन्सिकचे अधिकारी तसेच ठसे तज्ञांची घटनास्थळाहून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड व रक्ताने माखलेले कपडे आदी साहित्य जप्त केले. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.