अमृतसर । मोदी सरकाराच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून पंजाबमध्ये प्रदर्शन सुरु आहेत. या आंदोलनांची धग शेवटी दिल्लीच्या सीमेपर्यत पोहचली. आणि मागील ३ महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेत. या दरम्यान, अनेक शेतकऱ्यांचे जीव गेलेत.तर काही शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना विरोध म्हणून स्वत:चं जीवन संपवलं आहे.
अमृतसरमधल्या विरसा विहारमध्ये स्वातंत्र्य सैनिक उजागर सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित एका कार्यक्रमाला कीर्ती किसान युनियनचे प्रधान मास्टर दातार सिंग उपस्थित होते. कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दलचे विचार त्यांनी मांडले. अलविदा, माझी वेळ संपत आलीय, असं म्हणत त्यांनी भाषणाचा शेवट केला. ते खुर्चीत बसले. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपस्थितांनी सिंग यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
गेल्या अनेक दिवसांपासून दातार सिंग दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत होते. तीनच दिवसांपूर्वी ते तिथून अमृतसरला परतले. कार्यक्रमासाठी त्यांनी अमृतसर गाठलं होतं. या कार्यक्रमात भाषणानंतर सिंग यांचा सत्कार करण्यात येणार होता. मात्र त्याआधीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सिंग यांच्या कुटुंबावर आणि त्यांना मानणाऱ्या शेकडो व्यक्तींवर शोककळा पसरली आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.