सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब
शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यातूनच सांगली जिल्ह्यातील कासबेडीग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले. ही घटना सोमवारी पहाटे घडली. आंदोलनाची तीव्रता वाढत असून शासनाने तत्काळ दखल घ्यावी अन्यथा हा उद्रेक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या सात दिवसांपासून माजी खा राजू शेट्टी हे कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनस बसले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज द्या, वाढीव वीज दर रद्द करा, वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा, वीज बिले दुरुस्त करून द्या आदीसह अन्य मागण्यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र शासन दरबारी या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नसल्याने कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही या आंदोलनाची तीव्रता आता वाढत आहे.
याचं प्रश्नावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात दहा ते बारा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला इशारा देण्यात आला होता. मात्र तरीही कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यामुळेच रविवारी रात्री उशिरा सांगली इस्लामपूर रस्त्यावरील कसबेदिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले. कार्यालयातील कागदपत्रे व अन्य साहित्य जाळून खक झाले. यावेळी आगीच्या ज्वाला आकाशाला भिडल्या होत्या. अग्निशमन विभागाचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत आग विजवत होते. पहाटे अग्निशमन विभागाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. उर्जा मंत्र्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची धग वाढणार हे निश्चित…