सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे |
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आज जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला. आटपाडी तालुक्यातील झरे येथील ५८ वर्षाची महिला कोरोना बाधित होती. त्यांना मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आलं होत. त्यांची प्रकृती गेली काही दिवस चिंताजनक होती. मध्य रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. अद्याप कोरोना बाधितांपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.
जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. सध्या मुंबई तसेच अन्य राज्यातून आलेले प्रवासी दाखल होत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यामध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आटपाडी तालुक्यातील झरे येथे सहा दिवसांपूर्वी मुंबईतील नेरुळ येथून ५८ वर्षीय महिला आली होती, ती महिला कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले होते. सदरच्या महिलेस १ जून रोजी उपचारासाठी मिरजेतील कोरोना रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. त्या महिलेच्या घरातील पाच वर्षाच्या बालकामध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्याची कोरोनाच्या तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला. मुंबईहून आलेल्या महिलेला कोरोना सोबतच मधुमेह, थायरॉईड, दमा आणि हृदयविकाराचा आजार असल्याने त्यांना अधिक त्रास जाणवू लागला असल्याने त्यांना एनर्जेटिव्ह व्हेंटीलेटवर काही दिवसांपासून उपचार होते. उपचार सुरु असतानाच आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सांगलीतील विजयनगर येथील बँक कर्मचाऱ्याचा १९ एप्रिल रोजी मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली होती. कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील ६५ वर्षीय वृद्धाचा दुसरा, शिराळा तालुक्यातील मोहरे येथील ५० वर्षीय व्यक्तीचा तिसरा, ३० मे रोजी कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील ५७ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यू झाल्याने चौथ्या बळीची नोंद झाली होती. आता आटपाडी तालुक्यातील झरे येथील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे.
अद्याप पॉझिटिव्ह रुग्णांपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शिराळा तालुक्यातील मणदूर येथील ८१ वर्षाच्या पुरूष रूग्णास ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरू असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. औंढी येथील ५५ वर्षीय पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला असून सदर रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. शिराळा तालुक्यातील खिरवडे येथील ५६ वर्षीय व्यक्तीवर नॉन इनव्हेजिव व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. साळशिंगेतील साठ वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनाही व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या हि १४३ वर गेली असून सध्यस्थितीत ५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.