पालघर प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सेना युती होणार की नाही या संदर्भात अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता, पण अखेर युती झाली. पुढे तिकीट वाटपातही आयारामांना झुकत माप देत निष्ठावंताना डावलण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या त्यामुळे शिवसैनिक चांगलेच नाराज झाले आहेत. याच नाराजीतून मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना डहाणू तालुक्यात ५० प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला आहे. तेव्हा ऐन मतदानापूर्वी कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे शिवेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जातं आहे.
निवडणुकीपूर्वी शिवसेनेत सामील झालेल्या विरोधकांना तिकीट मिळाल्याने आतापर्यंत ज्यांच्या विरोधात काम केलं, आता त्यांचाच प्रचार कसा करायचा असा प्रश्नही शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे होता. मात्र, पक्ष नेतृत्वाकडून त्याची काहीच दखल घेतली गेली नसल्याने अनेक शिवसैनिकानी पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, कम्युनिस्ट पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आंबेसरीचे विद्यमान पंचायत समिती सदस्य विजय नांगरे, नागझरीचे माजी सरपंच वसंत वसावला, धुलुराम तांडेल आणि दोन्ही गावांतील अनेक ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. यावेळी बोलताना शिवसेना-भाजपने त्यांना अनेक बाबतीत कसे फसवले हे सांगत त्यांनी आपली खदखद व्यक्त केलीय. तसेच कम्युनिस्ट पक्षाशी एकनिष्ठ राहून विनोद निकोले यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र झटणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला. या सर्व कार्यकर्त्यांचे विळा हातोडा ताऱ्याचा लाल स्कार्फ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं.