नवी दिल्ली | गेल्या कित्येक दिवसापासून मोदी सरकारने मांडलेल्या तीन कृषी सुधारणा विधेयकांच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या वेशीवरच आंदोलन करत आहेत. 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीने या आंदोलनाला हिंसक वळण दिले. या आंदोलनाला वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटीनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामध्ये विदेशी सेलिब्रिटींचाही समावेश आहे. यानंतर विदेश मंत्रालयाने एक निवेदन जाहीर करून या सेलिब्रिटींची कान उघडनी केली आहे.
कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी अनेक दिवसापासून आंदोलन करत आहेत. त्यांना सामाजिक माध्यमांवरती मोठा प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून सुद्धा याची दखल घेतली जात आहे. नागरिक आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी सुद्धा यामध्ये सहभागी होत आहेत. अगदी अमेरिकन पॉप गायिका रिहाना पासून ते सुप्रसिद्ध पोर्नस्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक माध्यमावरती पोस्ट लिहिल्या होत्या. पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेही सोशल मीडिया वरती पोस्ट केली आहे.
यावर निवेदन जाहीर करून परराष्ट्र मंत्रालयाने या सेलिब्रेटींची कानउघडणी केली आहे. या निवेदनामध्ये परराष्ट्र मंत्रालय म्हणत आहे, की शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक स्वार्थी गट आपला स्वतःचा वेगळा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा माध्यमातून शेतकरी आंदोलनाला वेगळे रूप देणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. या विषयावरती काही बोलण्यापूर्वी अथवा प्रसिद्ध करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे योग्यप्रकारे निरसन होणे अत्यावश्यक आहे. भारतीय संसदेमध्ये अनेक वेळा चर्चा होऊन पूर्णपणे संमतीने कृषी क्षेत्राच्या संबंधित सुधारणा घडवून आणणारे सुधारणावादी कायद्यांना मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचा फायदाच आहे. तरी कोणीही याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कसलेही व्यक्तव्य करू नये. असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.