नवी दिल्ली | माणूस बुद्धिमत्तेच्या जोरावर कितीही उच्च पदावर जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अरुण जेटली. अरुण जेटली यांचे आज एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे मोठे मागील दीड वर्षांपासून त्यांना विविध आजारांनी गाठल्याने ते त्रस्त होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे.
अरुण जेटली असे राजकारणी होते की जे आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर भल्या भल्यांची बोलती बंद करत होते. ते राजकारणी म्हणून जेवढे प्रसिद्ध होते ते वकील म्हणून देखील तेवढेच प्रसिद्ध होते. त्यांनी १९८७ पासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली होती. काही दिवसातच त्यांनी तरुण वकिल म्हणून नाव कमावलेले होते.
१९७४ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष बनल्यापासून अरुण जेटली यांनी आपल्या राजकीय जीवनाला चांगल्या पध्द्तीने सुरुवात केली. त्यानंतर जय प्रकाश नारायण यांनी सुरु केलेल्या जनआंदोलनात देखील जेटली अग्रेसर होते. जे.पी मार्फत स्थापन केलेल्या नॅशनल कमेटी फॉर स्टुडंट अँड युथचे अरुण जेटली संयोजक म्हणून नियुक्त केले गेले. पुढे आणीबाणीचे पर्व सुरु झाल्यावर त्यांना अटक करण्यासाठी पोलीस शोधाशोध करू लागले तर त्यांनी गायब होणं पसंत केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळ घोषणा बाजी करू लागले. तेव्हा त्यांना पोलिसांनी तेथेच अटक केली. त्यानंतर त्यांना १९ महिन्यांचा कारावास झाला. प्रथम त्यांना अंबाला येथे जेल मध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी तिहारच्या जेल मध्ये करण्यात आली.
जेलमधून सुटून आल्यावर जेटलींनी चांगला अभ्यास करून कायद्याची पदवी पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी कायद्याची पदवी घेऊन नंतर दिल्लीतच वकिली करण्यास सुरुवात केली. ६ एप्रिल १९८० ला भाजपची स्थापना झाली तेव्हा त्यांनी भाजपचे सदस्यत्व घेतले आणि भाजपसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्याआधी त्यांनी जेल मध्ये राहिल्यामुळे इंदिरा गांधी यांच्या विरोधात जनता पक्षाचा प्रचार केला. जेटली यांचे कायद्याचे ज्ञान पाहून व्ही. पी. सिंग सरकाराने त्यांना केंद्र सरकारचा अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नेमले. तर १९९१ साली भाजपने त्यांना राष्ट्रीय कार्यकारणीचा सदस्य देखील बनवले. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पहिलेच नाही. अनेक नेत्यांना त्यांनी घडवले.
१९९९ साली अटल बिहारी वाजपेय यांच्या सरकार मध्ये अरुण जेटली यांना राज्यमंत्री म्हणून नेमण्यात आले. त्याकाळात त्यांनी माहिती आणि प्रसारण तसेच विधी खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले. तर अरुण जेटली २००० ते २०१२ पर्यंत गुजरात मधून तर २०१८ मध्ये उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे सदस्य निवडले गेले. २००९ साली त्यांची राज्यसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली. या निवडीनंतर अरुण जेटली यांनी काँग्रेसला राज्यसभेत घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी दिलेली भाषणे देखील खास गाजली. २०१४ साली त्यांचा अमृतसर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कॅप्टन अमरेंद्र सिंग यांनी पराभव केला. तरी देखील नरेंद्र मोदी यांनी त्यांना अर्थमंत्री पदाची जबाबदारी दिली. अरुण जेटली यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीत उत्तम काम केले. मात्र त्यांना आजारांनी असाह्य दुःख दिले. त्यातच त्यांनी आज प्राणज्योत मालवली.