हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाकचौरे यांच्यासोबत इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील ठाकरे गटात सामील झाले. या सर्वांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेस भाजप असा प्रवास करून वाकचौरे यांनी पुन्हा घर वापसी केली.
यावेळी बोलताना वाकचौरे यांनी, “शिवसेना आता फक्त महाराष्ट्रात नाही तर दिल्लीच्या तख्तापर्यंत नेऊन पोहचवायची आहे. मी घर वापसी केली आहे. मी काहीही चूका केल्या असल्या तरी मी घर वापसी केली आहे. तो अपराध मी मान्य करून परत आलो आहे” असे म्हणले. मुख्य म्हणजे, आता ठाकरे गटात भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद आणखीन वाढली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांची तयारी सुरू असताना वाकचौरे यांचा पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरू शकतो.
शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी आज त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला, पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. pic.twitter.com/Piz96GlJHO
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 23, 2023
दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करतात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी, “शिर्डीची जागा आपलीच आहे, आपल्याला ती निवडून आणायची आहे. भाऊसाहेब यांनी शिवसेना सोडली. पण कधी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही. हे पापी, गद्दार शिवसेना संपवायला निघालेत. त्याचा शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही” अशा शब्दात भाजपवर टीका केली.
तसेच शिंदे गटावर प्रहार करत, “भाऊसाहेबांनी चूक केली होती, पण पाप केले नव्हते. भाऊसाहेब माझी माफी मागितली नाही तरी चालेल पण शिवसैनिकांची माफी मागावी. पक्ष संपवणारा विरोधक पहिल्यांदा आपण पाहत आहोत. शिवसैनिक चुकीला माफी देतो. पण पापाला माफी देत नाही. राजकारणातून गद्दारांना संपवायचं आहे” अशी अप्रत्यक्ष टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.