हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ऍक्शन मोड मध्ये आले असून कोणासोबत आघाडी होवो अथवा न होवो, तुम्ही आत्तापासूनच कामाला लागा अशा सूचना पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि वॉर्ड अध्यक्षांना दिल्या आहेत.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज राष्ट्रवादीचे वॉर्ड अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची सर्व सूत्रे पवारांनी आपल्या हातात घेतली आहेत. दर २०दिवसांनी पवार हे मुंबईतील परिस्थितीचा वॉर्ड अध्यक्षांकडून आढावा घेणार असून कोणत्या वॉर्डात पक्षाची ताकद आहे, असे वॉर्ड निश्चित करुन त्याचाही आढावा ते घेणार आहेत.
शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यामुळे मुंबई महापालिका पुन्हा आपल्या हातात ठेवणे शिवसेनेसाठी अवघड बनल आहे. त्यातच या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी होईल की नाही याबाबत अद्याप काहीच स्पष्टता नाही. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत.