हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप नेत्यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. आगामी सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत आम्ही या सर्व जागावर फक्त ओबीसी उमेदवार देऊ अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी फडणविसांचे स्वागत करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. सरकारमधील ओबीसी नेते काका – पुतण्याच्या ताटाखालील मांजर झालं असून ओबीसी मंत्र्यांच माकड झालं आहे अशा शब्दांत पडळकरांनी तोफ डागली.
ओबीसी नेत्यांच्या शब्दाला या महावसुली सरकार मध्ये कवडीची किंमत नाही , यांच्या शब्दाला मातीमोल किंमत या सरकार मध्ये आहे असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. ओबीसी नेते हे फक्त मलिदा खाण्यासाठी सत्तेमध्ये आहेत का?? की यांनी ओबीसींचा आत्मसन्मान विकला आहे असे प्रश्न पडळकर यांनी उपस्थित करत नेत्यांवर तोफ डागली.
जर तुम्ही निवडणूक घेतल्या तर राज्यातील ओबीसी समाज, भटका समाज, बहुजन समाज गप्प बसणार नाही, हा वणवा महाराष्ट्रभर पेटल्या शिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. येत्या 26 तारखेला या महाराष्ट्रतील तमाम ओबीसी आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.