मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांनी टीम इंडियाचे प्रशिक्षक असताना त्यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते.त्यावर आता त्यांनी आपल्या निर्णयाबाबत मोठे भाष्य केले आहे. ग्रेग चॅपल प्रशिक्षक असताना टीम इंडिया 2007 सालच्या वर्ल्ड कपमधून ग्रुप स्टेजलाच बाहेर गेली होती. तसेच ग्रेग चॅपल प्रशिक्षक असतानाच सौरव गांगुलीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि मग त्याला टीममधून डच्चू देण्यात आला. ग्रेग चॅपल टीम इंडियाचे प्रशिक्षक होते तेव्हाच काळ टीम इंडियासाठी सगळ्यात वाईट होता असे अनेक क्रिकेटपटूंनी सांगितले आहे. या सगळ्या वादग्रस्त कारकिर्दीवर ग्रेग चॅपल यांनी आता भाष्य केले आहे.
राहुल द्रविडला टीम इंडियाचा कॅप्टन केले
‘राहुल द्रविडला भारतीय क्रिकेट टीमला पुढे घेऊन जायचं होतं आणि त्याला भारतीय टीम जगातली सर्वोत्तम टीम करायची होती, पण इतर वरिष्ठ खेळाडू टीममधलं स्वत:चं स्थान वाचवण्यासाठी खेळत होते. जगातली सर्वोत्तम टीम होण्यासाठी द्रविडने भारतीय टीममध्ये खूप गुंतवणूक केली होती, पण टीममधल्या प्रत्येकाची तशी भावना नव्हती. टीममध्ये कायम राहणं, याच गोष्टीवर काहींना लक्ष केंद्रीत केलं होतं. करियरच्या शेवटाकडे आल्यामुळे काहींचा बदल स्वीकारायला विरोध होता,’ असा गौप्यस्फोट ग्रेग चॅपल यांनी केला आहे. तसेच ‘सौरव गांगुलीला टीममधून डच्चू दिल्यामुळे इतरांनाही टीममधलं आपलं स्थान ग्राह्य धरून चालणार नाही, हा संदेश मिळाला. सुरुवातीला या गोष्टीचा टीमसाठी फायदाही झाला, पण गांगुलीचं टीममध्ये पुनरागमन झाल्यानंतर गोष्टी पुन्हा बदलल्या,’ अशी प्रतिक्रिया ग्रेग चॅपल यांनी दिली आहे.
‘सौरव गांगुलीला टीममधून बाहेर केल्यानंतर इतर खेळाडूंना आपणसुद्धा टीमच्या बाहेर जाऊ शकतो, याची जाणीव झाली. 12 महिने टीमने चांगले प्रदर्शन केले, पण नंतर विरोध वाढला. गांगुलीचं टीममध्ये पुनरागमन झालं. आम्हाला बदल नको, असा त्यांचा स्पष्ट संदेश होता. बीसीसीआयने मला नवीन करार ऑफर केला होता, पण त्याला मी नकार दिला, कारण मला तेवढा ताण नको होता,’ असेदेखील ग्रेग चॅपल म्हणाले.