Gujarat Election 2022 : मोदी गड राखणार की केजरीवाल बाजी मारणार??

gujarat election modi vs kejriwal
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर अशा २ टप्प्यात मतदान आहे तर ८ डिसेंबरला निकाल लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आम आदमी पक्षाने ज्याप्रकारे प्रचार केला आहे ते पाहता मोदी -शहा यांच्यापुढे घरच्या मैदानावरच मोठं आव्हान असणार आहे.

गुजरातमध्ये गेल्या २७ वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता आहे. सलग सातव्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर २०१७ च्या निवडणुकीत निसटलेला विजय पुनः एकदा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. तर पहिल्यांदाच गुजरात विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या आम आदमी पक्षालाही दिल्ली आणि पंजाब नंतर गुजरातमध्ये सत्तेची स्वप्ने पडत आहेत. आम आदमी पक्षाच्या एन्ट्रीने भाजप आणि काँग्रेस दोघांच्याही पोटात गोळा आला असेल कारण मागील निवडणुकीत विधानसभेच्या 35 जागा अशा होत्या जिथे विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये फक्त 1 ते 5 हजार मतांचा फरक होता. त्यामुळे आपचा फटका काँग्रेसला बसतो की भाजपला बसतो हे निवडणूक निकालानंतरच कळेल.

दुसरीकडे गुजरात म्हंटल की फक्त मोदी आणि शाह हेच समीकरण आहे. संपूर्ण देशाचा कारभार करणाऱ्या मोदी- शहाना कोणत्याही परिस्थितीत गुजरात मध्ये विजय आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात एक पंतप्रधान म्हणून मोदींनी गुजरातला दिलेले झुकत माप आणि केलेला विकास हि मोदींची जमेची बाजू आहे. पण दुसरीकडे पंजाबच्या धर्तीवर आम आदमी पक्ष गुजरातमध्ये जोमाने प्रचारात व्यस्त असून पंजाबप्रमाणे येथेही निवडणूक रणनीती बनवत आहे. आपकडे अरविंद केजरीवाल यांच्यासारखा व्हिजन असणारा नेता आहे. गुजरातमध्ये भाजपचा पराभव करण्यात केजरीवाल यांना यश आले तर देशात एक वेगळा संदेश जाऊ शकतो आणि त्याचा मोठा फटका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बसू शकतो. तर दुसरीकडे जर केजरीवाल यांनी या निवडणुकीत भाजपचा अस्मान दाखवल्यास २०२४ लोकसभेसाठी मोदींविरोधी चेहरा म्हणून त्याच नाव समोर येऊ शकत.

केजरवाल महागाईच्या मुद्यावरून भाजपला टार्गेट करत आहेत. केजरीवाल यांनी लोकांना मोफत वीज, दवाखान्यात मोफत उपचार तसेच खाजगी शाळांचे ऑडिट, स्विस बँकेतील काळे धन परत आणणार अशी वेगवेगळी आश्वासने दिली आहेत. याशिवाय ज्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजप राजकारण करते तेच हिंदुत्त्व आणखी पुढे घेऊन जाण्याची खेळीही केजरीवालांनी केली आहे. त्याचाच भाग म्हणजे चलनी नोटांवर गणेश आणि लक्ष्मी देवी या देवतांचा फोटो लावण्याची त्यांनी केलेली मागणी.. या सर्व गोष्टींमुळे गुजरात मध्ये सध्या काँग्रेसपेक्षा केजरीवालांचे खरं आव्हान भाजपपुढे आहे. त्यामुळे मोदी- शहा आपला गड राखणार की गुजरात निवडणुकीत बाजी मारत केजरीवाल भाजपला सुरुंग लावणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.