“बाळासाहेबांनी दिलेला ‘तो’ ताईत आजही माझ्या देव्हाऱ्यात”; गुलाबराव पाटलांकडून आठवणींना उजाळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. 1999 सालची गोष्ट आहे. या काळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर माझ्या कपाळाला गुलाल लावून गळ्यात ताईत घातला. त्यानंतर मी आमदार म्हणून निवडून आलो. ही आठवण मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. बाळासाहेबांनी दिलेला तो ताईत आजही माझ्या घराच्या देव्हाऱ्यात आहे, असे पाटील यांनी म्हंटले.

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना आज राहिली नाही, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. त्यांना मी सवगु इच्छितो की, आम्हाला विरोधकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या पाठीशी आणि देशात हिंदुत्वासाठी शिवसेना सातत्याने उभी राहते.

मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी शिवसैनिक सतत लढा देत आले आहेत. सरकार स्थापनेपासून विरोधकांचे फाटले आहे. त्यांच्याकडे आज कोणताही मुद्दा नसल्याने ते शिवसेनेवर मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करत असतात. त्यांनी सरकार स्थापनेवेळी जर पहल केली असती तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.