हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्याबाबत न्याय झाला नव्हता असं विधान वकील गुणरत्ने सदावर्ते (Gunaratna sadavarte) यांनी केलं आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते यांच्या संघटनेचे पॅनल उतरले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.
आज सदावर्ते यांची ज्याठिकाणी पत्रकार परिषद झाली त्यावेळी तेथे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सोबतच नथुराम गोडसे यांचा फोटो सुद्धा लावण्यात आला होता. हा फोटो पाहून आश्चर्य वाटलं, परंतु सदावर्ते यांनी गोडसेचे समर्थन करत आपली भूमिका स्पष्ट केली. मी वकील होतो. त्याचबरोबर संविधानाचा अभ्यासक आहे. आज मला सांगायचं आहे कि, नथुराम गोडसे यांच्यासोबत फाशीची ट्रायल झाली होती. नथुराम पळून गेले नाहीत. त्यांनी ट्रायल फेस केली. नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता असं गुणरत्ने सदावर्ते म्हणाले.
यावेळी सदावर्ते यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. शरद पवारांचा वैचारिक व्हायरस, म्हणे शरद पवारांना धमकी दिली, आणि मागणी करायला कोण गेलं? तर त्यांची मुलगी. यांना कोण धमकी देणार? दाऊद इब्राहिम कोणाच्या काळात पळाला? असा सवाल त्यांनी केला. तसेच शरद पवारांच्या वैचारिक वायरसचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभर सभा आणि बैठका घेऊ. सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन चैत्यभूमी पासून शरद पवार व्हायरसचे निर्जंतुकीकरण रॅलीला सुरुवात करणार असल्याचे सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.