हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांना चितावणीखोर भाषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आज त्यांच्यावर गिरगाव कोर्टात सुनावणी पार पडली असून सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत 13 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
यापूर्वीही गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केल्याने सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 530 असे जवळपास दीड कोटींहून अधिक पैसे गोळा केल्याचा दावा वकील प्रदीप घरत यांनी केला. तसेच या सर्व पैशाची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.
शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता.६ एप्रिल रोजीच या हल्ल्याचा कट ठरला होता. हे सगळं षडयंत्र गुणरत्न सदावर्तेंनी रचलं. १२ एप्रिलला बारामतीत आंदोलन करायचं, हे सदावर्ते भ्रम करण्यासाठी सातत्याने सांगत होते. पण सगळं नियोजन गुणरत्न सदावर्तेंनी केलं. त्यानुसार ठरल्याप्रमाणे पवारांच्या घरावर एसटी कामगार चालून गेले. पवारांच्या घरावर हल्ला झाला तेव्हा सदावर्तेंना नागपूरमधून फोन येत होते, असा दावाही सरकारी वकिलांनी न्यायालयात केला