हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडामुळे राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. यात राष्ट्रवादीतील अनेक नेते शरद पवारांना (Sharad Pawar) डावलून अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत. आता जयंत पाटील देखील अजित पवार गटात सामील होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच विधान मंत्री हसन मुश्रीप (Hasan Mushrif) यांनी जयंत पाटलांविषयी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. “जयंत पाटलांनी आमच्याबरोबर शपथ घेतली असती, पण जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडे थांबले आहेत” असे हसन मुश्रीफ यांनी म्हणले आहेत.
एका घटनेमुळे ते तिकडे थांबले…
गुरूवारी माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटलांचे गुपित उघडकीस आणले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “जयंत पाटलांनी आमच्याबरोबर शपथ घेतली असती. तो इतिहास मी सांगत बसत नाही. ते गोपनीय आहे. पण, ज्या पक्षाबरोबर आम्ही गेलो, त्यांच्यासाठी जीवाचं रान करू. आम्ही भूमिका बदलली आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहणं, आमचे कर्तव्य आहे. जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडे थांबले आहेत. ती घटना सांगणार नाही. कधीतरी सांगेल” आता हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जयंत पाटलांचे कोणते गुपित समोर येईल, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात सामील होतील असा दावा अजित पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला, अजित पवार गटातीलच काही नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटलांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता या दोन्ही गटात नेमक्या काय भानगडी सुरू आहेत, याबाबत राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.