हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पार पडलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. भाजप अन काँग्रेस यांच्यात जोरदार टशन झालेल्या हिमाचल प्रदेशमध्ये चांगलीच कांटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशात भाजप ३४ आणि काँग्रेस ३१ जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्षाचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. तर अन्य पक्षाचे उमेदवार तीन जागांवर आघाडीवर आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एका नेत्याला सिमल्याला पाठवण्यात आले असून सत्तास्थापनेची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरवात झाली आहे. भाजप अन काँग्रेस दोन्ही पक्षांचे उमेदवार आळीपाळीने आघाडी घेत असल्यानं निकाल त्रिशंकू लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने आता हिमाचल प्रदेशात सत्तास्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी भाजपचे महासचिव विनोद तावडे यांना शिमला येथे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील सत्तास्थापनेच्या वाटाघाटींमध्ये विनोद तावडे हे महत्त्वाची भूमिका बजावतील, असे दिसत आहे.
भाजप आणि काँग्रेसची अपक्षांना गळाला लावण्यासाठी मोर्चेबांधणी
भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांनी पाठिंबा मिळवण्यासाठी आधीपासूनच हालचाली सुरु केल्या होत्या. निवडून येण्याची चिन्हे असलेल्या अपक्ष उमेदवारांशी दोन्ही पक्षांकडून संपर्क साधला जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षाला किमान ३५ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सध्याची परिस्थिती पाहता याठिकाणी काँग्रेस आणि भाजपला ३३ अशा समसमान जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तास्थापनेत अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.