राजकीय लोकांना धमकी प्रकरणी चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करणार- दिलीप वळसे पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधक व सत्ताधाऱ्यांनी एकत्रित येऊन यापुढे व यापूर्वी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना धमकी देणाऱ्याची कठोर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाची घोषणा केली. “राजकीय लोक, मंत्र्यांना धमकी प्रकरणाचा व भविष्यात उध्दभवणाऱ्या अशा प्रकरणाबाबत तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात येत आहे, असे वळसे पाटील यांनी म्हंटले.

मुंबईतील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी मंत्र्यांना दिल्या जात असलेल्या धमकी प्रकरणावर चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधक व सत्ताधारी यांनी धमकी प्रकरणी चौकशी करण्यासाठी सदस्यांची समिती गठीत करावी, अशी मागणी केली.

या प्रकरणी मंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या फोनबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, या प्रकरणी आरोपीना अटक करण्यात आलेली आहे. संबंधित आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे इतरही धमकी प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून केली जाईल. यासाठी उच्चस्तरावर माहिती घेतली जाईल. तसेच एसआयटीची स्थापना केली जाईल. त्याद्वारे यापुढे अशा प्रकारचे धमकीचे प्रकार घडणार नाही, याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले जाईल, असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.