कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
लंडनहून परतल्यानंतर होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश असतानाही अंबाबाई मंदिरात पुजेसाठी आलेल्या पुजाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. १४ मार्च ते ३१ मार्चपर्यंत घरातच थांबण्याचे आदेश असताना संबधित पुजारी बुधवारी सकाळी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात पुजेच्या साहित्यासह आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिसांत ही कारवाई केली. संबधित ६५ वर्षीय पुजाऱ्याची शेंडा पार्कमध्ये रवानगी करण्यात आली.
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी बाधित भागातून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन आदेश देण्यात आले आहेत. तरीही अंबाबाई मंदिर आवारातील एका अन्य मंदिरातील पुजारी बुधवारी सकाळी गरुड मंडपामध्ये पोलिसांना दिसून आला. संबधित पुजारी हा लंडनहून परतला होता. त्याची वैद्यकीय तपासणी शासकीय रुग्णालयात (सीपीआर) करुन १४ ते २८ मार्च कालावधीत होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने त्यांना ३१ मार्चपर्यंत घरीच थांबण्याचा आदेश दिला होता. या दोन्ही सुचनांकडे दुर्लक्ष करुन संबधित पुजारी गुढी पाडव्यादिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी पुजेच्या साहित्यासह अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपामध्ये दिसला.
होम क्वारंटाईन आदेशाकडे डोळेझाक करुन संबधित पुजारी गेले दोन दिवस सार्वजनिक ठिकाणी फिरत होता अशी माहिती समोर आली आहे. बुधवारी तो गरुड मंडपामध्ये दिसून आला. त्याच्यावर भादविस कलम १८८, २६९ व २७० नुसार गुन्हा दाखल करुन इस्टिट्यूशन क्वारंटाईन करुन त्याची रवानगी शेंडा पार्कमध्ये केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.