सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील 24 वर्षीय सुजाता शंकर भोळे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दि. २० रोजी घडली होती. यामध्ये सासरच्या लोकांकडून तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला. विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी काल पती शंकर काळूराम भोळे याला अटक केसात आली होती. दरम्यान त्याला आज सातारा येथील न्यायालयात यूजर केले असता न्यायालयाकडून पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
याबाबत मृत विवाहितेचे चुलते अतुल दत्तात्रय धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुजाता शंकर भोळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पती शंकर काळूराम भोळे, सासू लीलावती कळूराम भोळे, दिर राजेंद्र काळूराम भोळे, जाऊ स्वाती राजेंद्र भोळे, यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या संपूर्ण कुटुंबावर भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 304B, 489A, 302, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, शनिवार, दि. 22 रोजी संशयित आरोपी शंकर भोळे याला त्वरित अटक करा या मागणीसाठी सुजाता भोळे यांच्या नातेवाईकांनी कृष्णाई वंदन या ठिकाणी जाऊन निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सातारा पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला. सातारा विभागीय पोलीस अधिकारी आंचल दलाल यांनीही भेट देऊन नातेवाईकांची समजूत काडून संशयित आरोपी शंकर भोळे यास लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आरोपीला काल अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्याला न्यायालय समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या पकरणाचा अधिक तपास सातारा पोलीस करत आहेत.
12 तासातच आरोपीच्या आवळल्या मुसक्या
विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्र हलवली. 12 तास होण्याआधी तपास अधिकारी एस. एम. मछले आणि सातारा शहर गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून गायब झालेल्या शंकर भोळे याच्या मुसक्या आवळल्या.