नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महेंद्रसिंग धोनीच्या नंतर रिषभ पंतने टीम इंडियामध्ये आपली जागा पक्की केली. रिषभ पंत हा आता टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. सुरुवातीच्या काही सामन्यात त्याला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही तेव्हा त्याच्यावर टीकासुद्धा करण्यात आली. या २३ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाजाने आपल्या अडीच वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत असा पराक्रम केला आहे जो धोनीला १५ वर्षांच्या कारकिर्दीत जमला नाही. धोनीच काय भारताच्या एकाही यष्टिरक्षक-फलंदाजाला हा पराक्रम करता आला नाही.
आयसीसीने बुधवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत रिषभने टॉप १० मध्ये आपले स्थान पटकावले आहे. रिषभने मागच्या ७ – ८ महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना रिषभ पंतने उल्लेखनीय कामगिरी करत टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखली. त्यानंतर लगेच इंग्लंडविरुद्ध मालिका खेळवण्यात आली. त्यामध्येदेखील त्याने उत्तम प्रदर्शन करत मालिका जिंकली. याचा फायदा त्याला आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत झाला.
या खेळीच्या जोरावर रिषभने टॉप टेन फलंदाजांमध्ये प्रवेश करताना विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या स्थान पटकावले आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टॉप टेन मध्ये प्रवेश करणारा तो पहिलाच भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ठरला आहे. धोनीला फक्त १९ व्या क्रमांकापर्यंत मजल मारता आली होती. रिषभ,रोहित शर्मा,हेन्री निकोल्स हे संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर आहेत.