फडणवीस बेळगावात प्रचाराला आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जर बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल, असे वक्तव्य महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी गुरुवारी केले. गेल्यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सीमाप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली होती. तेव्हा आताच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा महाराष्ट्रातील कोणताही नेता प्रचारासाठी येणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. पण तसे झाले तर तो नेता महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्रोही असल्याचे सिद्ध होईल, असे शुभम शेळके यांनी सांगितले.

शुभम शेळके यांनी गुरुवारी बेळगावात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी ते पुढे म्हणाले, बेळगावातील मराठी जनता जागी झाली आहे. भाजपकडे मुद्दे काहीच नाहीत. त्यामुळे मराठी मतांमध्ये फूट पाडण्याची त्यांची खेळी आहे. पण मराठी माणसांचे डोळे उघडले आहेत. राष्ट्रीय पक्षांचा ढोंगीपणाचा बुरखा फाटला आहे. त्यांच्या डावपेचांचा मराठी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीवर काहीही फरक पडणार नाही, असे शुभम शेळके यांनी म्हटले.

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महाराष्ट्रातून राष्ट्रीय पक्षाच्या प्रचाराला कोणत्याही नेत्याने येऊ नये, असं आम्ही यापूर्वी कळवलं होतं. बाकीच्या पक्षांकडून तसा प्रतिसाद आला. मी अपेक्षा व्यक्त केली होती की, महाराष्ट्र भाजपमधून कुणी येऊ नये. पण आता तसं होत असेल तर दुर्दैवी आहे, असे शुभम शेळके यांनी म्हटले.

You might also like