हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळया चर्चांना सुरूवात झाली आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या भेटीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. “शरद पवार हे सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता येईल ही अट पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवार समोर ठेवली आहे” असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकिय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना, “सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटी वाढत आहेत. शरद पवार हे सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता येईल ही अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार समोर ठेवली आहे. त्यामुळं अजित पवार हे शरद पवारांचे समर्थन मिळवण्यासाठी वारंवार त्यांना भेटत आहेत” असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
मुख्य म्हणजे, “अजित पवार हे शरद पवारांची भेट घेऊन त्यांना सोबत येण्यासाठी दया, याचना करत असावेत. असे देखील वडेट्टीवार यांनी म्हणले आहे. त्याचबरोबर, “आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून थोडा संभ्रम आहे. मात्र आज शरद पवार यांच्या बीडमधील भाषणाने तो संभ्रम दूर होईल” असे संकेत वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात एक बैठक पार पडल्यामुळे हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार का हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, या बैठकीमध्ये अजित पवार यांनी भाजपकडून शरद पवार यांना दोन मोठ्या पदांची ऑफर दिल्याचे देखील समोर आले आहे. मात्र, याबाबत बोलताना आमची ती बैठक फक्त काका, पुतण्याच्या नात्याने झाली होती त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी देखील भाजपसोबत जाण्यास साफ नकार दिला आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चाविषयी बोलताना “भाजपासह जाण्यात मला काहीही स्वारस्य वाटत नाही. मात्र काही हितचिंतक आहेत ज्यांना वाटतं आहे की मी भाजपासह जायला तयार व्हावं. आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे की भाजपासह जाणं ही आमच्या पक्षाची भूमिका नाही” असे शरद पवार यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे.