माझं नाव घेताय ना मग माझीही सचिन वाझे प्रकरणी चौकशी करा : अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव याप्रकरणी जोडले जात आहे. याप्रकरणी पंढरपुरात आज अजित पवार यांच्याकडे याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारणी केली असता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाझे प्रकरणी झालेले आऱोप फेटाळून लावले. तसेच या प्रकरणी माझी कोणतीही चौकशी करावी त्यास माझी तयारी आहे. असे खुले आव्हान विरोधकांना दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पंढरपुरात आज आले आहेत. आज सकाळी त्यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याण काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आढीव येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वाझे प्रकरणी विरोधकांना खुले आव्हान दिले.

यावेळी पवार म्हणाले, वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही. माझे वाझेशी कधी संभाषण देखील झाले नाही. त्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्याचं काहीच कारण नाही. तरीही माझे नाव का घेतले हे मला माहिती नाही माझे याप्रकरणी नाव आल्याने माझी चौकशी करावी. माझ्यावरील हा आरोप धादांत खोटा आहे. सध्या अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात माझीही चौकशी करावी, चौकशीत दूध का दूध पानी का पानी होईल. विरोधकांकडून जाणूनबुजून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे.

You might also like