जि.प. शाळांची गुणवत्ता सुधारा अन् गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना नापास करा – काँग्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता पातळी अलीकडच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर ढासळली आहे. यामुळे शेतकरी वर्गातील अन् ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यापार्श्वभुनीवर जि.प. शाळांची गुणवत्ता सुधारा अन् गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना नापास करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांना भेटून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील यांनी राज्यातील जिल्हापरिषद शाळेतील सुमार गुणवत्तेचा लेखा जोखा मांडला आहे. तसेच अधिकारी व शिक्षक यांच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले. बालाजी गाडे यांनी प्रधान सचिवांना निवेदन देऊन शिक्षण व्यवस्थेतील अनेक प्रश्न मांडले.

गाव खेड्यातल्या गोर गरीब शेतकरी, कामगार, शेतमजूर या अडाणी जनतेचे पाल्य येथे शिकत असतात. या पालकांना त्यांची मुले काय शिकतात त्यांची किती प्रगती झालीय हे समजेल असे नाही त्यामुळे शिक्षकांनी प्रामाणिक पणे विद्यार्थ्यांना शिकवणे गरजेचे आहे. पण असे होतांना दिसत नाही. माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्याला साधं मराठी सुद्धा नीट वाचता व लिहिता येत नाही .मग शिक्षक आणि शिक्षण विभाग करतोय तरी काय ? ज्यांना वाचता येत नाही त्यांना पुढच्या वर्गात पाठवलंच कसं जातंय? असा सवाल त्यांनी केला. धर्म आणि जातीच्या राजकारणात मश्गूल असलेले सत्ताधारी याकडे अजिबात लक्ष देणार नाहीत.

शिक्षका अभावी शाळा बंद पडत आहेत. अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. ती रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी बालाजी गाडे यांनी केली तसेच शिक्षकांवर शिकवण्या व्यतिरिक्त अनेक प्रशासकीय कामांचा भार टाकला जातो त्यामुळे त्यांना मूळ शिक्षकी पेशाला न्याय देता येत नाही याकडे सुद्धा त्यांनी प्रधान सचिवांचे लक्ष वेधले.

गाव खेड्यातल्या शाळा ओस पडत आहेत आणि शिक्षकांच्या सुमार दर्जा मुळे विद्यार्थी सुद्धा सुमार तयार होत आहेत. हेच विद्यार्थी पुढे प्रौढ झाल्यावर गुणवत्ता नसल्यामुळे बेरोजगार होऊन समाजावर भार होऊन जगत आहेत. त्यातूनच गुन्हेगारीचे , नशाखोरीचे प्रमाण ही वाढत आहे . गुणवत्ता प्रधान शिक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नाही आणि नोकरी नसल्या मुळे लाखो मुलांचे आज लग्न होत नाहीयेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बालाजी गाडे पाटील यांनी शिक्षण विभागाला दिला आहे. समाजा तील सुजाण नागरिक व पालकांनी या समाजहिताच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.