2004 मध्येच भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती पण.., प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमध्ये वैचारीक मंथन शिबीर आयोजित करण्यात आले होते. गुरुवारी शिबिराची सांगता झाली. दोन दिवस सुरू असलेल्या या शिबिरामध्ये अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा देखील समावेश आहे. त्यांनी, “भाजप आणि राष्ट्रवादीची युती ही 2004 मध्येच होणार होती. पण दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना याबाबतची माहिती दिली आणि युती बारगळली” असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या युती संदर्भात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

शिबिरात बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “2004 साली राष्ट्रवादी नुकतीच जन्माला आली होती. त्यावेळी 16, 16, 16 करत लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला आणि भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी स्वतः भाजप नेते प्रमोद महाजन माझ्या घरी होते. हे सगळं भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंग यांच्या सूचनेनुसार झालं होतं. त्यावेळी प्रमोद महाजन यांना लक्षात आलं की, आपलं दिल्लीतल महत्त्व कमी होईल त्यामुळे त्यांनी बळासाहेब ठाकरे यांना माहिती लीक केली आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी आडवी तिडवी टीका केली आणि होणारी युती होऊ शकली नाही”

शरद पवार कायम प्रवाहासोबत चालले…

त्याचबरोबर, “मी शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 1986 मध्ये परत आले. शरद पवार हे कायम प्रवाहासोबत चालले. आपण देखील प्रवाहासोबत चाललो आहोत. अजित पवार यांना हे भेकड म्हणतात. त्यांना सांगतो, राज्यात जो कोणी मर्द असेल तर ते एकमेव अजित पवार आहेत” असे देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले.

अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय

इतकेच नव्हे तर, “अजित पवार यांचे चांगले आणि गोड संबंध होते. मात्र जवळ नव्हते कारण मी शरद पवार यांच्या जवळ होतो. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत मी गेलो. त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटलं की अजित पवार यांच्यासोबत कसं काय? आपण अजित पवार यांच्या सोबत जाताना राजकीय भूमिका घेतली होती. आता आपण भूमीका घेतली आहे, दादा एके दादा. दादांसोबत जाण्याचा आता निर्णय घेतला आहे” अशा शब्दात त्यांनी ते अजित पवारांबरोबर का गेले याचे कारण सांगितले.