नात्यात असुरक्षितता येऊ नये म्हणून..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हृदयात वाजे समथिंग | सुमित सुनिता सुभाष

आपल्या जनरेशनचा एक मोठा झोल आहे… नाती हाताळण्याबाबत.. आपण प्रेमात पडतो, जीव लावतो मनापासून एकमेकांवर..पण हे करत असताना स्वतःचं अस्तित्व कुठेतरी गमावताना दिसतोय.. विशेषतः मुलींच्या बाबत हे होतंय!

प्रेम करणे म्हणजे स्वतःच स्वातंत्र्य दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देऊन मोकळं होणे नव्हे !!

मधल्या काळात राजवैभवने हे सोप्या शब्दात सांगितलं होतं..
आपण नात्यांमध्ये स्पेस देतो, स्पेस देते अशी भाषा वापरतो. पण अशी स्पेस द्यायला घ्यायला ती स्पेस कुणाच्या मालकीची नाही! स्वातंत्र्य, स्पेस देण्याघेण्याची गोष्ट नसून मान्य करण्याची आहे!

आणि कदाचित प्रेमाची आपली संकल्पनाच गंडलेली आहे.. प्रेमाला केवळ शारिरीक आणि भावनिक अंगाने पाहतोय आपण.. प्रेम करतो तर त्या प्रेमातून काहीतरी छान निर्माण व्हायला हवं.. काहीतरी एकत्र भविष्य निर्माण व्हायला हवं.. एकमेकांच्या पॅशनला सोबत व्हायला हवी.. एकमेकांचं व्यक्तिमत्व अधिक फुलायला हवं.. अधिक समृद्ध व्हायला मदत व्हायला हवी!

पण हे असं काहीच न होता केवळ लग्न, मजा मस्ती, शारीरिक भावनिक गरजा, मुलं बाळं याच अंगाने अजूनही जातोय आपण! आणि हे एकवेळ ठीक आहे.. पण हे करत असताना स्वतःचं मन मारून, स्वतःच्या सन्मानाला ठेच पोहचवत जगत असू… तर हे प्रेम नाही, गुलामगिरी आहे!

बऱ्याचदा नात्यांमध्ये येणारा पजेसिव्हनेस.. हा पजेसिव असणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी असण्याचे लक्षण आहे.आणि बऱ्याचदा नात्याच्या सुरुवातील असतेच असुरक्षितता.. ती सहज मानवी भावना आहे. आणि यातून आपल्यावर येणारी बंधने, आपल्याला होणारा त्रास आपण काही काळ जरूर समजून घ्यायला हवा. नात्यांमधली असुरक्षितता हळू हळू कमी होत जाईल, या आशेने काही काळ हे सहन करावेच. शिवाय हे कमी व्हावे यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या पार्टनर सोबत चर्चा करावी. संवाद ठेवावा. विश्वास द्यावा. सततच्या संवादातून यावर मार्ग सहजपणे निघू शकतो. तुला पजेसिव वाटतेय का? हा प्रश्न विचारणे, आणि वाटत असेल तर तसे मोकळेपणाने सांगणे हे व्हायला हवे. त्यावर खेळकर चर्चा व्हायला हव्यात. कधीतरी गंभीर होऊन स्वतःचे प्रेम तरलतेने, सोबत राहून व्यक्त करायला हवे. यातून प्रश्न सुटतात.

पण हा संवाद करत असताना स्वतःच्या वर्तनावर बंधन आणणे चुकीचे आहे. आपल्या पार्टनरला याची सवय होते आणि मग तो केव्हाच या मानसिक त्रासातून बाहेर येत नाही.

या सगळ्यातून मार्ग निघत नसेल, संवादातून, चर्चेतून देखील पार्टनर प्रतिसाद देत नसेल, अथवा चर्चाच करायला तयार नसेल.. आणि ही असुरक्षितता कमी होतच नसेल.. तर मात्र आपल्या नात्याचा जरूर पुनर्विचार करावा. खरेच तुमचा पार्टनर तुम्हाला डिझर्व करतो का, याचा विचार करावा. खरेच हे नाते टिकवायचे आहे का याचा विचार करावा.. कारण सततची असुरक्षितता, भीती यातून नात्यातील मजाच कालांतराने हरवत जाते आणि नाते जरी टिकून राहिले तरी त्यात तुम्ही एक गुलाम म्हणून राहता. ते नाते खरोखर तुमचे राहत नाही !!

शेवटी तुमचा आत्मसन्मान हा सर्वात महत्त्वाचा आहे. तो गमावून कोणतीही गोष्ट कराल तर ती तरल, निखळ आनंद नाही देणार !!

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment