सातार्‍यात दोन्ही राजेंच्याविरोधात महाविकास आघाडी ठोकणार शड्डो; पालिकेच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या राजकारणात उतरून दोन्ही राजेंना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी शड्डू ठोकणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातारा पालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली आता गतिमान झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन उतरणार असल्याचे सांगितले होते. आता दीपक पवार यांनीदेखील पुन्हा एकदा त्यांचीच री ओढली आहे.

सातारा पालिकेमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडी सत्तेवर आहे, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास आघाडी ही प्रमुख विरोधक आहे. तर त्याखालोखाल भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. त्यातही दोन्ही राजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी सोयीने दोन्ही राजेंचे नेतृत्व स्वीकारलेले आहे.

दरम्यान, दोन्ही राजे राष्ट्रवादीत होते तेव्हाही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढलेली नव्हती. आता ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना राजेंनी कमळाच्या चिन्हावर पालिका निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा आहे. सध्याच्या परिस्थितीत ही अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता नाही. असे झाले नाही, तर भाजपच्या चिन्हावर स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासाठीही काही सदस्यांनी तयारी सुरू केलेली आहे. अशा परिस्थितीतच राष्ट्रवादीनेदेखील पॅनेल उभे करण्याची घोषणा केली असल्याने इच्छुकांना चौथा पर्याय मिळणार आहे.

जावळी-सातारा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत विद्यमान आमदार अफवा पसरवत आहेत. वास्तविक, स्थानिक ग्रामस्थांनी मिळून अनेक ग्रामपंचायती बिनविरोध केलेल्या आहेत. तसेच ज्यांची निवडणूक झाली, त्यात बहुतांश ग्रामपंचायती या राष्ट्रवादीचे नेतृत्व मानणाऱ्या आहेत. सातारा तालुक्यातील सैदापूर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. मात्र निकालाबाबत चुकीच्या पध्दतीने अफवा पसरवल्या जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment