गुवाहाटी । संपूर्ण देशाला कोरोनाच्या विषाणूने विळखा घातला आहे. देश ठप्प आहे. नागरिक भीतीच्या वातावरणात घरात कोंडून आहेत. लॉकडाउन आणि अर्थचक्रही मंदावलं हे सर्व एका विषाणूमुळे घडत आहे. दरम्यान आता एक नवीन संकट उभं ठाकलं आहे. भारतात आता आफ्रिकी स्वाइन फ्लू दाखल झाला आहे. .या आजारामुळे आसाममधील ३०६ गावातील २ हजार ५००हून अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे. तज्ञांच्या मते हा आजार मानवापर्यंतही पोहोचू शकतो. मात्र, तशी शक्यता नसल्याचे आसामचे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय मंत्री अतुल बोरा यांनी स्पष्ट केले आहे.
रविवारी आसाम या राज्यात या आजाराची पहिली घटना उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे या आजाराचा उद्रेक चीनमध्ये आधीपासूनच सुरू आहे. या आजारामुळे तेथील जवळपास ४० टक्के डुकरांचा मृत्यू झाला आहे. आसामचे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय मंत्री अतुल बोरा यांनी या आजाराबाबत माहिती अधिक दिली. डुकरांमध्ये आढळलेला हा फ्लू अफ्रीकी स्वाइन फ्लू (एएसएफ) असल्याची पुष्टी भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने (एनआयएचएसएडी) केली आहे. देशातील या आजाराची ही पहिलीच घटना असल्याचे बोरा यांनी सांगितलं. तसेच या रोगाचा कोविड -१९शी काही संबंध नसल्याचेही बोरा यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या हा आजार मानवापर्यंत पोहोचेल असे वाटत नसल्याचेही बोरा यांनी म्हटलं. सध्या ज्या ठिकाणी या आजाराचं संक्रमण होत नाही अशा ठिकाणचे डुक्कर खाण्यात काही धोका नसल्याचे बोरा यांनी सांगितलं. केंद्राकडून मान्यता मिळाल्यानंतर त्वरित डुकरांना ठार मारण्याऐवजी या प्राणघातक संसर्गजन्य रोगाचा फैलाव थांबविण्यासाठी राज्य सरकार इतर कोणताही मार्ग अवलंबणार आहे, असही बोरा यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”