जोहान्सबर्ग । टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बुधवारी, दुसऱ्या कसोटीच्यातिसऱ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात 266 धावा करून बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने अर्धशतके झळकावली. हनुमा विहारीनेही नाबाद 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. टीम इंडियाने पहिल्या डावात 202 धावा केल्या होत्या तर दक्षिण आफ्रिकेने 229 धावा केल्या होत्या. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे.
या मैदानावरील चौथ्या डावातील यजमान दक्षिण आफ्रिकेचा विक्रम पाहता संघाने 12 वेळा फलंदाजी केली आहे. ज्यामधील 7 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे, तर संघाला केवळ 3 सामने जिंकता आले आहेत. तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. यादरम्यान, त्यांना भारताविरुद्ध या सामन्यापूर्वी चौथ्या डावात तीनदा खेळण्याची संधी मिळाली. त्यातील 2 सामने अनिर्णित राहिले तर एका सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेला आता हा सामना जिंकण्यासाठी चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.
200 हून जास्त धावा करून फक्त एकच सामना जिंकला
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जोहान्सबर्गच्या वांडरर्स मैदानावर केवळ एकदाच 220 हून अधिक धावा करून विजय मिळवला आहे. संघाने 2006 मध्ये न्यूझीलंडविरुद्धचा सामना 6 विकेट्सवर 220 धावा करून जिंकला होता. संघाने या मैदानावर चौथ्या डावात 7 विकेट गमावत 450 धावांची मोठी धावसंख्याही उभारली आहे. मात्र, 2013 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात खेळलेला हा सामना अनिर्णित राहिला होता. याशिवाय यजमान संघाने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 291 धावा केल्या होत्या. ज्यावेळी तो संघ हरला होता. भारताविरुद्धच्या इतर दोन सामन्यांच्या चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेने अनुक्रमे 278 आणि 228 धावा केल्या.
टीम इंडिया कधीही हरली नाही
या मैदानावरील टीम इंडियाचा विक्रम पाहिला तर, आतापर्यंत एकही कसोटी येथे हरलेली नाही. या सामन्यापूर्वी संघाने येथे 5 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 2 सामने त्यांनी जिंकले आहेत, तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. जर संघाने ही कसोटी जिंकली तर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकाही जिंकेल.