सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यातील जावली तालुक्यातील भणंग ग्रामपंचायतीत चक्रावून सोडणारा निकाल लागला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना धक्का देत अपक्षांनी बाजी मारली. भणंग ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी राष्ट्रवादी अन् भाजपाचे 14 उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचा अपक्ष उमेदवारांनी पराभव केला आहे. केवळ राष्ट्रवादीचा सरपंच पदाचा उमेदवार निवडूण आला आहे.
साताऱ्यात जावली तालुक्यातील भणंग या एकमेव लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भणंग ग्रामपंचायतीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. भणंग येथे भाजप आ. शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे दीपक पवार यांना मानणाऱ्या समर्थकाचे पॅनलमध्ये लढत होती. त्यासोबत सर्वच जागांवर अपक्षांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये अपक्षांनी दोन्ही प्रतिस्पर्धीचे सर्व उमेदवारांना धूळ चारत सर्व जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. प्रथमच अभूतपूर्व इतिहास भणंग गावात घडलेल्या पहायला मिळला.
या निवडणूकीत थेट सरपंच निवडणुकीत राष्ट्रवादीचे दीपक पवार यांच्या गटाचा गणेश साईबाबा जगताप हे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. भाजपाच्या पॅनल मधील एकही उमेदवार निवडून आला नाही. दोन्ही पॅनलचे परस्पर विरोधी सर्व उमेदवार या निवडणुकीत पडले असून अपक्ष उमेदवारांची लॉटरी लागली असल्याने हा निकाल लक्षवेधी ठरला आहे.