हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगाल निवडणूकीनंतर आता तरी पंतप्रधान मोदी यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. अर्थव्यवस्था सावरायला देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा असेही राऊत यांनी म्हंटल.
मंदीतून सावरण्यासाठी अर्थव्यवस्थेस उभारणी देण्यासाठी आपण नक्की काय करीत आहोत यावर देशाचे पंतप्रधान व अर्थमंत्री काहीच बोलायला तयार नाहीत. प. बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी नक्कीच हरतील, असे मोदी सांगतात. हे काही कोसळणाऱया अर्थव्यवस्थेवरील ‘रेमडेसिवीर’ उपचार नव्हेत. महाराष्ट्राचे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळेल, असे अमित शहा म्हणतात. हासुद्धा मंदी व बेरोजगारीच्या प्रश्नावरचा उतारा नाही. देशाच्या अर्थमंत्री तर कुठेच दिसत नाहीत. असे संजय राऊत म्हणाले.
भारतासारख्या देशात उत्पादनाचा वेग घटला आहे. लोकांनी नोटाबंदीच्या काळात नोकऱ्या गमावल्याच होत्या. आता लॉक डाऊनमध्ये उरलेल्या लोकांनीही नोकऱ्या गमावल्या. बाजारात हालचाल नाही. लोकांची पैसे खर्च करण्याची क्षमता संपली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करून त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे,” असं सांगत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या अर्थमंत्रीपद दुसऱ्या व्यक्तीकडे देण्याचा सल्ला दिला आहे.
कोणी काही म्हणा, पश्चिम बंगालच्या निवडणुका संपल्याने निदान पंतप्रधान मोदी यांनी आता रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे! देशाला त्याचीच गरज आहे. देशाला आता विश्वास आणि सकारात्मक ऊर्जेची गरज आहे. ती लवकरात लवकर मिळो!, असंही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.