नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १८ जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साऊथॅम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार आहे. आयसीसीकडून टेस्टचा दर्जा प्राप्त असलेले १२ पैकी १० देशांनी तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळले आहेत. आता या यादीमध्ये भारताचा समावेश होणार आहे. ८९ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय टीम तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार आहे.
कसोटीचा दर्जा प्राप्त असलेले भारत आणि बांगलादेश हे दोनच संघ आतापर्यंत तटस्थ ठिकाणी सामने खेळले नाही आहेत. उर्वरित १० संघ तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळलेले आहेत. पुढील महिन्यात भारत जेव्हा न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यास उतरेल तेव्हा हा इतिहास रचला जाणार आहे. पाकिस्तानमध्ये काही वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यामुळे त्यामुळे एक दशकांपेक्षा अधिक काळापासून कोणताही संघ पाकिस्तानात क्रिकेट खेळलेला नाही. या कालावधीमध्ये पाकिस्तान यूएई आणि श्रीलंकेत क्रिकेट मालिकांचे आयोजन करत आहे. बाकीचे देश पाकिस्तानविरुद्ध खेळत असल्याने त्यांना तटस्थ ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली आहे.
२२ वर्षांपूर्वी मिळाली होती संधी
भारताला याअगोदर १९९९ मध्ये तटस्थ ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली असती. १९९९ मध्ये भारत तेव्हा आशियाई टेस्ट चॅम्पिनयशिप खेळत होता. या आशियाई टेस्ट चॅम्पिनयशिपचा अंतिम सामना ढाक्यात खेळवण्यात आला. यामध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. त्यावेळी जर भारत अंतिम सामन्यात पोहोचला असता तर भारताला तटस्थ ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली असती.