हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी अमेरिकेत कृष्णवर्णीय असलेल्या जॉर्ज फ्लॉईड नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा वर्णद्वेषविरोधी आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या शहरात सुरू झाले असून त्याची झळ थेट व्हाइट हाउसपर्यंत पोहोचली आहे. काही शहरांमध्ये मात्र या आंदोलनाला हिंसक असे वळण लागले आहे. यामध्ये काही ठिकाणी पोलीस स्टेशनला आगीही लावण्यात आल्या आहेत. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आंदोलनात सहभागी असणाऱ्या गटाला ‘अँटिफा’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणार असल्याचे म्हटले आहे.
”अँटिफा” म्हणजे आहे तरी काय?
अमेरिकेमध्ये फॅसिझमविरोधात असणाऱ्या गटाला ‘अँटिफा’ (AntiFascists) असे म्हंटले जाते. या गटात फॅसिझमविरोधातील, डाव्या विचार सरणींच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. नवफॅसिझम,नवनाझीवाद तसेच वर्णद्वेषाविरोधात हा गट ऍक्टिव्ह असतो. हा गट सरकारच्या धोरणांविरोधात सतत आंदोलन करत असतो. निदर्शने, मोर्चे, मानवी साखळी करणे असे या गटाच्या आंदोलनाचे स्वरुप असते.
‘अँटिफा’ची स्थापना कशी करण्यात आली ?
‘अँटिफा’ या गटाच्या स्थापनेविषयी साध्यतरी फारशी माहिती उपलब्ध नाही आहे. मात्र, असे सांगितले जाते कि, १९२०-३० च्या दशकात युरोपीयन फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात हा गट स्थापन करण्यात आला होता. तर, ‘अँटिफा’चे आंदोलन १९८० च्या दशकात ‘अँटि-रेसिस्ट एक्शन नावाच्या एका गटाच्या आंदोलनाद्वारे सुरू झाले, अशी माहिती या गटाशी निगडीत असलेले सांगतात. मात्र मध्यंतरीच्या काळात हा गट तितकासा ऍक्टिव्ह नव्हता. आता डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यानंतर या गटाच्या आंदोलनाला पुन्हा एकदा ताकद मिळाली.
‘अँटिफा’चे सदस्य कोण कोण आहेत ?
या गटातील कार्यकर्त्यांना अमेरिकेत ओळखणे फारच कठीण काम आहे.पोलीसांच्या कारवाईची भीती असल्यामुळे अनेकजण आपली ओळख लपवून असतात. वर्णभेदाचे असे एखादे प्रकरण समोर आल्यानंतर या गटाशी संबंधित सदस्य आंदोलनस्थळी जमा होतात. या गटासाठी अधिकृत असा कोणताही नेता नाही आहे. मात्र स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते हे एकमेकांशी नेहमीच संपर्क ठेवून असतात.
‘अँटिफा’ गट इतरांपेक्षा वेगळे काय करते?
‘अँटिफा’ हा गट अमेरिकेतील इतर काही काही अराजकतावादी गटांप्रमाणे काम करतो. यामध्ये आंदोलनस्थळी कार्यकर्ते आंदोलन करताना काळे कपडे घालणे, मास्क घालणे अशा पद्धतीचा अवलंब करतात. या गटाच्या आंदोलनाचा रोख हा प्रामुख्याने भांडवलशाही आणि त्यांच्या व्यवस्थेवर असतो. पोलीस आणि इतर यंत्रणांना हा गट आपले लक्ष्य करतो.
या ‘अँटिफा’गटाचा नेमका हेतू तरी काय आहे ?
फॅसिस्ट तसेच वर्णभेद करणाऱ्या विचारांना हा गट विरोध करतो. वेगवेगळ्या मंचावरून याविषयीच्या विचारांना आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यात येतो. अल्पसंख्याक, एलजीबीटी समुहाच्या समर्थनात तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात निदर्शने आणि आंदोलने करण्यावर यांचा अधिक भर असतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.