इरफान खान यांनी आजारपणात (इंग्लंडमध्ये असताना) लिहिलेल्या आणि पत्रकार अंशुल चतुर्वेदी यांनी इंग्रजीत संपादित केलेल्या लेखाचा कृतार्थ शेवगावकर यांनी केलेला मराठी अनुवाद.
मला तीव्र स्वरूपाच्या न्यूरोइंडोक्राईन कॅन्सरचे निदान होऊन आता काहीसा काळ लोटला आहे. हे नाव माझ्या शब्दसाठ्यामध्ये अगदीच नवीन आहे. हा एक दुर्मिळ आजार आहे. इतर आजारांच्या तुलनेत याविषयी फारशी माहिती आणि अनुभव उपलब्ध नाही. त्यामुळे उपचारांमध्ये खूपच अनिश्चितता आहे. माझा उपचार हा ट्रायल अँड एरर पद्धतीचा उपचार आहे. म्हणजे औषध देऊन मात्रा लागू पडतेय का ते बघायचं. नाही लागू पडली की पुन्हा दुसरं औषध देऊन बघायचं. पुन्हा पुन्हा तेच. आजार होण्याआधी माझ्या आयुष्यात एक वेगळाच खेळ सुरू असतो. “मी एका वेगाने धावणाऱ्या रेल्वेतून प्रवास करत असतो. माझी स्वप्न,ध्येय,भविष्यातील इच्छा-आकांक्षा यात मी रममाण झालेला असतो. अचानक कोणीतरी खांद्यावर हात ठेवतं. मी पाहतो, तर तो टीसी असतो. तो म्हणतो “तुमचं स्टेशन येतंय. उतरा. “माझा गोंधळ उडून मी म्हणतो. “नाही नाही. माझं स्टेशन आलेलं नाहीये.”
“माझं असच झालंय. त्या अचानकपणात मला समजतं की तुम्ही फक्त समुद्राच्या पाण्यात तरंगणाऱ्या लाकडी ओंडक्यासारखे आहात, जो अनिश्चिततेच्या लहरींसोबत वाहवत जातोय आणि तुम्ही त्यावर जिवाच्या आकांताने ताबा मिळवायचा प्रयत्न करताय. या अनागोंदीच्या, धक्क्यांच्या आणि घबराटीच्या वातावरणात जगत असताना आणि दवाखान्यात एक भयंकर उपचार घेत असताना मी माझ्या मुलाच्या कानात पुटपुटतो. “सध्याच्या परिस्थितीत या संकटाला तोंड देण्यासाठी काहीही करून मी माझ्या पायांवर उभं राहावं एवढीच माझी ‘स्वतः’ कडून अपेक्षा आहे. भीतीने माझ्या जगण्यावर विजय मिळवून माझी अवस्था दयनीय करता कामा नये.”
असे मी म्हणतो आणि अचानक प्रचंड वेदना व्हायला सुरुवात होते. वेदना तुम्हाला ऐकून ठाऊक असते, पण आता तिचा स्वभाव आणि तीव्रता तुम्हाला समजते. कशाचाच गुण येत नाही. सांत्वन आणि प्रेरणा या गोष्टी कुचकामी ठरतात. त्या क्षणाला ब्रह्मांड आठवतं. वेदना आणि फक्त वेदनाच. देवापेक्षा प्रचंड मोठी वाटणारी. थकलेला आणि गलितगात्र झालेला मी दवाखान्यात जातो.
माझ्या दवाखान्याच्या समोर लॉर्ड्स मैदान आहे. माझ्या लहानपणीच्या स्वप्नातील “मक्का” होतं ते. प्रचंड वेदना होत असताना मला समोर विवीयन रिचर्ड्सचं हसरं पोस्टर दिसतं. मला त्याबद्दल काहीच वाटत नाही. जणू माझा त्या जगाशी काही संबंधच उरला नाहीये. दवाखान्याच्या वरच्या मजल्यावरच कोमा वॉर्ड आहे. माझ्या दवाखान्यातील रूमच्या बाल्कनीत मी एक दिवस उभा होतो आणि एक चमत्कारीक गोष्ट लक्षात आली. मी अक्षरशः हादरलो. जीवन आणि मृत्यूच्या खेळात केवळ एक रस्ता आहे. एका बाजूला दवाखाना आहे तर दुसऱ्या बाजूला मैदान. ‘अनिश्चितता’ हाच दवाखाना आणि मैदान या दोघांचा स्थायीभाव. या कल्पनेने माझ्या मनाला जोरदार धक्का दिला. माझ्या हॉस्पिटलच्या या चमत्कारिक स्थानाने मला शिकवले की अनित्यता ही एकमेव नित्याची गोष्ट आहे. स्वतःच्या क्षमता जाणून घेणे आणि मैदानात टिकून अधिकाधिक चांगला खेळ खेळत राहणे इतकंच मी करू शकतो.
या जाणिवेने मला शरण जायला आणि विश्वास ठेवायला शिकवले. “पुढे काय होईल? हे सगळे मला कोठे घेऊन जाईल ? अजून दोन महीने की चार महिने की 2 वर्षे?? हे सर्व विचार या जाणिवेने बॅकफूटवर जाऊन हळूहळू विरत गेले. माझ्या मनातून नाहीसे झाले.
“स्वातंत्र्य”म्हणजे काय? हे मला नव्याने उमजले. सिद्धी प्राप्त झाल्यासारखे वाटले. जणू जीवनाची चव मी पहिल्यांदाच चाखतोय. जगण्याची अशी जादुई बाजू मी अनुभवली. माझा स्वतःचा जगण्यावरील विश्वास वाढला. जणू त्या विश्वासाने माझ्या प्रत्येक पेशीत प्रवेश केलाय असंच जाणवलं. हा विश्वास किती टिकेल हे वेळ सांगेलच, परंतु आतातरी मला असं वाटतंय.
माझ्या या संपूर्ण प्रवासात जगभरातून लोक मला सदिच्छा देत आहेत, माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. यात ओळखीचे लोक आहेतच, परंतु कित्येक लोकांना तर मी ओळखतही नाही. हे लोक वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या वेळांना माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. या सर्व प्रार्थना एकत्र होऊन माझ्या मनाच्या खोल आतपर्यंत पोहचत आहेत. या प्रार्थना जणू एक मोठा विजेचा स्त्रोत आहेत, जो माझ्या पाठीच्या कण्यातून थेट मेंदूत प्रवेश करतोय. त्या प्रार्थनांचं बीज अंकुरतंय. रुजतंय. त्यांना पालवी फुटतेय,कळ्या येताहेत,त्याची फुलं होताहेत आणि मी त्यांचाकडे पाहत बसलोय. यातील प्रत्येक कळी, पान, फुल तुमच्या एकत्रित प्रार्थनेतून जन्माला आलंय.
लाकडी ओंडक्याला लहरींचा ताबा मिळवायची गरज नसते. निसर्ग तुम्हाला हळूहळू हेलकावे देत तरंगत ठेवतो, हेच खरं !!
लेखन : इरफान खान
इंग्रजी संपादन : अंशुल चतुर्वेदी
मराठी अनुवाद : कृतार्थ शेवगावकर