नवी दिल्ली | नाना पाटेकर यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत आला आहे. मात्र नाना पाटेकर अन्य कारणाने अमित शहा यांना भेटायला गेले होते असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
विधानसभेची ज्या राज्यात निवडणूक आहे. त्या राज्यातील नामांकित आणि एकाद्या क्षेत्रात प्रसिद्ध असणारी व्यक्ती भाजपमध्ये घेण्याचे भाजपने निश्चित केले असल्याने महाराष्ट्रातून नाना पाटेकर यांना भाजपमध्ये घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यांना राज्यसभा देखील दिली जाण्याची शक्यता आहे. नाम फौडिशनच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी केलेली समाजसेवा लोकांच्याच नव्हे तर भाजप नेत्यांच्या देखील मनात भरली आहे. त्यामुळे नाना पाटेकर त्यांना हवे हवे असे वाटू लागले आहेत.
दरम्यान नाना पाटेकर यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिला नाही. त्यांनी फौडिशनच्या परदेशी निधी संकलनासाठी जे प्रमाणपत्र लागते त्यासाठी आपण अमित शहा यांना भेटलो आहे असे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील पुरस्थितीवर देखील चर्चा केल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले आहे. अमित शहा आणि नाना पाटेकर यांच्यात तब्बल २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली असल्याचे बोलले जाते आहे.