मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही; अजित पवारांचे मोठे विधान

Ajit pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यांत चर्चेचा भाग बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही, असे मोठे विधान त्यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. या मागणीसंदर्भात बोलताना अजित पवार यांनी म्हटले आहे की, “आरक्षणाबाबत एखादा निर्णय घेताना तो कायद्याच्या, घटनेच्या चौकटीत बसला पाहिजे. याआधी दोन सरकारांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण ते कायद्याच्या चौकटीत टिकले नाही. त्यामुळे टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ज्या घटकांना आरक्षण मिळाले आहे, त्यांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे”

त्याचबरोबर, “उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटीचांही विचार करण्यात येत आहे. त्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. आपल्याला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. प्रत्येकजण सध्या वेगवेगळ्या पद्धतीने आपआपली भूमिका मांडत आहे. मात्र सरकार म्हणून काम करताना आम्हाला कायदा-सुव्यवस्था, घटना या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात आणि सध्या सरकार या सर्व गोष्टी बघून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे” असे देखील अजित पवारांनी म्हणले आहे.

दरम्यान, “हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात नेते काय भूमिका मांडत आहेत, यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. 24 डिसेंबरनंतर मराठा समाज काय आहे, हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ” असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता याबाबत सरकार काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.