हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संधी उपलब्ध होत नसेल तर संधी निर्माण करा आणि यशस्वी व्हा ! असं बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल तसाच काहीसा प्रकार काल सांगली – मिरज – कुपवाड महानगर पालिकेच्या महापौर निवडीच्या वेळी अनुभवायला आला.
तसं पाहता ७८ सदस्यांच्या सांगली महापालिकेत भाजपचे संख्याबळ हे ४२ एवढे होते म्हणून भाजपचा महापौर आणि उपमहापौर निवडून येणे ही काही खूप अवघड बाब नव्हती. तसंही महापालिकेत विद्यमान सत्ताधारी हा भाजपचं असल्यामूळे ही निवड एकतर्फी मानण्यात येत होती.
पण सत्तेच्या खेळात कोण – कधी – कशी खेळी करेल हे कुणालाच सांगता येत नाही.
सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी एकदा मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, लढाई ही आपल्या हिशेबाने खेळायची असते. समोरच्याच्या हिशेबाने नाही.राग आला की लगेच झालंच सुरू असं नाही “टप्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच”…त्यावेळी पाटलांचा हा डायलॉग राज्यभर गाजला. तसाच सांगली महापालिकेत सुद्धा टप्प्यात आल्यावर जयंत पाटील कार्यक्रम करतील हे कुणाच्या ध्यानीमनी देखील नव्हतं.
पण जयंत पाटील यांनी फासे फेकायला सुरुवात केली होती. मग ती संजयकाका पाटील यांच्यासोबत बसून केलेली गुफ्तगू असेल किंवा ऐन मतदानाच्या एक दिवस अगोदर भाजपचे सात नगरसेवक यांचे बंद झालेले फोन असोत. हा सगळा त्यांच्या रणनीतीचा भाग होता असं काही जाणकार सांगत आहेत. म्हणजे जयंत पाटील यांनी “दाखवलं उजवं आणि हाणलं डावं” अशा तऱ्हेने राजकारण करतं राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांना महापौर पदी आणि उपमहापौर पदी काँग्रेसच्या उमेश पाटील यांना निवडून आणलं. या सगळ्यामध्ये जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी मोलाची भूमिका बजावली असल्याचं बोललं जातंय. आता तर फक्त महापालिका झाली यापुढे थेट ग्रामपंचायती पासून सत्ता बदलायला सुरूवात होईल अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.